नांदेड : भाजपचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल कारण अदृष्यं हात हे सरकार वाचवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. सरकार वाचवणारे अदृष्यं हात शरद पवार आणि काँग्रेसचे असतील, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. नांदेड महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही काँग्रेसला मदत करतो असा आरोप करता पण गद्दारी आमच्या रक्तात नाही. आम्ही छातीवर वार करतो, पाठीवर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच सरकारनं जून २०१७ पर्यंत कर्जमाफी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.


लोडशेडिंगवरून भाजपवर निशाणा


गोरगरिबांना मोफत वीज जोडणी देऊ म्हणता, पण त्यामध्ये करंट आहे का? लोडशेडिंगनं महाराष्ट्र होरपळला आहे. विकासासोबत प्रकाशही गायब झाला आहे. कोळसा नाही हे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावरही तुमचं लक्ष नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे.


प्रताप पाटील चिखलीकरांना थेट आव्हान


प्रताप पाटील चिखलीकरांचा मी स्वत: प्रचार केला आणि त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा देऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. प्रताप पाटील चिखलीकरांवर उद्धव ठाकरेंनी बेडूक म्हणूनही टीका केली.


पंतप्रधानांवरही लक्ष्य


पंतप्रधान होऊन तीन वर्ष झाली मात्र आज त्यांना शाळा आठवली. म्हणून आज कपाळावर माती लावली. त्यावेळी शाळेत गेले नाही म्हणून आज गेले. या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं. गुजरात निवडणुका आल्यावर खाकऱ्यावरचा जीएसटी कमी केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.