मुंबई : Uddhav Thackeray Interview : भाजपला (BJP) शिवसेना (Shiv Sena) संपवायची आहे. पण त्यांना ते शक्य नाही. शिवसेना संपणार नाही तर ती पुन्हा जोमाने वाढेल. प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिली आहे. आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवत आहेत. बोंब मारत आहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. 'सामना'साठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, ही जी काही आता सोंगं ढोगं करतायत की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं, ती करावी लागली नसती आणि आता ते म्हणताहेत की ‘आमची’ शिवसेना ही शिवसेना नाही. हे सगळं तोंडपाठ करुन त्यांचं समाधान होत नाही, कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवं म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरत आहेत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. ते विचारतायत ना तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्वातला फरक काय, तर तो हा फरक आहे. शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं. पण त्यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरलं.


हिंदुत्व सोडल्याची आवई, माझे वडील का चोरताय?


उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, शिवसेना कायद्याची आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही? 


आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.


हिंदुत्व धोक्यात आलं काय?


मला एक प्रसंग असा दाखवा किंवा माझ्या हातून घडलेली एखादी गोष्ट अथवा मुख्यमंत्रीपदावर असतानाचा एखादा निर्णय सांगा की, ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा. अयोध्येला तर तुम्ही आतासुद्धा गेला होतात. अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभं करतो आहोत. बरोबर आहे? हे हिंदुत्वाला सोडून आहे का? तुम्हीच ठरवा. मुख्यमंत्री होण्याआधी मी अयोध्येत गेलो होतो. प्रत्येक वेळी आपण होतात. मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा अयोध्येत गेलो होतो. कोण काय म्हणेल याची मी पर्वा केली नाही. मी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन तेव्हाही आलो होतो. दोनदा मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. आता नवी मुंबईत आपण तिरुपती मंदिरासाठी जागा दिली. जी प्राचीन मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं, जतन करणं हे आपण सुरू केलं. गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण सुरू केलं. यात हिंदुत्व गेलं कुठे? आपण हिंदुत्वापासून दूर गेलो असा कोणताही निर्णय केला नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.