Sanjay Raut On PM Modi: युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदी मैदानात तलवारबाजी करीत आहेत, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभा घेत असले तरी त्यांनी महाराष्ट्राचं भरपूर नुकसान केलं आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून त्यांचे उमेदवार कोण असणार हे भारतीय जनता पार्टीच ठरवत असल्याने खरं कोण खोटं कोण हे उघडत होत असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे. एवढ्यावरच न थांबता मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत, असंही म्हटलं आहे.


लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची आणि मग...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पंतप्रधानपदाचा सर्व लवाजमा घेऊन मोदी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रचार सभा घेत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात यायला काहीच हरकत नाही, पण आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानपदाच्या सुविधांचा वापर करणे हे नियमात बसत नाही. टी. एन. शेषन यांच्या काळात मोदी यांनी हे वर्तन केले असते तर शेषन यांनी मोदींवर कायद्याचा बडगा उगारला असता," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आपल्या 'रोखठोक' सदरामधून राऊत यांनी, "देशात लोकसभा निवडणूक विषम पातळीवर लढवली जात आहे. भाजपकडे एका बाजूला प्रचंड साधन संपत्ती, सरकारी यंत्रणा, पोलीस, मीडियाचे बळ आहे, तर विरोधकांना काहीच मिळू नये यासाठी राज्यकर्ते सर्व पातळ्यावर प्रयत्न करीत आहेत. त्यांची बँक खातीही सरकारने सील केली. लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे," अशी टीका केली आहे.


युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांना कोठडीत डांबून...


"अर्थात महाराष्ट्राचे युद्ध हेच खरे महाभारत आहे. दुष्टांचे निर्दालन हे श्रीकृष्णाचे ध्येय होते. त्यासाठी त्याने सर्व प्रकारच्या खटपटी केल्या. साधनशूचिता आणि भीष्माने ठरवून दिलेले युद्धाचे नियमही त्याने पाळले नाहीत. द्रोणाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला खोटे बोलायला लावले. धर्माने शल्यालाही युद्धाच्या वेळी, “तू कर्णाला दूषणे देऊन नामोहरम कर,” असे सांगितले. जयद्रथाचा वध करणे अर्जुनाला शक्य व्हावे म्हणून सूर्य झाकून त्यास फसवले. कर्णाचा वध तर संशयास्पदच आहे. मोदी हे आज रामाचा जप करतात, पण युद्धभूमीवर सत्याने नव्हे, तर कपटनीतीने वागत आहेत. कंसाने ज्याप्रमाणे त्याच्या सर्व शत्रूंना म्हणजे सज्जनांना बंदी बनवले, तसे मोदींनी केले. युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदी मैदानात तलवारबाजी करीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.


शिवसेना कोणाची? हे मोदी ठरवू शकत नाहीत


"मोदी चार दिवसांपूर्वी चंद्रपुरात आले व त्यांनी सांगितले, “एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असून तेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे.” नरेंद्र मोदी यांच्या हातात अमर्याद सत्ता एकवटली आहे व निवडणूक आयोगास दबावाखाली आणून त्यांनी शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली. मोदी व त्यांच्या लोकांनी केलेली ही लबाडी आहे. चंद्रपुरात शिंदे मोदींच्या व्यासपीठावर होते व शिंद्यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे होते. त्यामुळे नकली शिवसेना ही मोदी यांच्या बाजूलाच शरणागत अवस्थेत उभी होती. शिवसेना कोणाची? हे मोदी ठरवू शकत नाहीत. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत जनताच त्याचा निर्णय करेल," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


गळ्यात भाजपचा पट्टा घातलेले शिंदे...


पंतप्रधान मोदींनी शिंदेंची शिवसेना खरी असल्याचा उल्लेख केल्यावरुनही राऊतांनी टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असे सांगताना मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत असे सांगणे म्हणजे शिवसेनेच्या स्वाभिमानी संघर्षाचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मागण्यासाठी अमित शहा हे ‘मातोश्री’वर गेले होते. 2014 आणि 2019 साली मोदी हे पंतप्रधान होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याच पाठिंब्याचे पत्र भाजपने घेतले होते. तेव्हा शिंदे हे शिवसेनेच्या मुख्य वर्तुळात नव्हते. आज त्यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा घातला आहे. शिंदे यांनी लढून काहीच मिळवले नाही. भाजपपुढे शरणागती पत्करून आजचे स्थान मिळवले. हे असे लोक बाळासाहेबांच्या विचारांचे वाहक कसे ठरणार? ज्यांना मोदी ‘खरी शिवसेना’ अशी उपाधी बहाल करतात त्या शिवसेनेच्या उमेदवारांचा पत्ता कट करण्याचे काम भाजपने केले. शिंदे यांच्या माणसांना उमेदवाऱ्या द्यायच्या की नाही हे भाजप ठरवत आहे व गळ्यात भाजपचा पट्टा घातलेले शिंदे गप्प आहेत. शिंदे हे शिवसेना नाहीत हे मोदींच्या पक्षानेच दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे व त्यांच्या गटाचे काय होणार? हे सांगता येत नाही. शिंदे व त्यांच्या लोकांत लढण्याचे बळ नाही. पैसा हेच सर्वस्व व त्याच्या जोरावर राजकारण करता येते असे वाटणाऱ्यांपैकी मोदी-शहा आहेत व शिंदे हे त्याच विचारांचे असल्याने त्यांचे मोदी-शहांशी जमले, पण हा विचार शिवसेनेचा असू शकत नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे.


इतक्या शक्तिमान मोदींना आपल्या देशातील तरुणांना नोकऱ्या देता आल्या नाहीत


"लोकसभा निवडणुकीत कार्यवाहक पंतप्रधान मोदी देशाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. ते विरोधकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातच दंग आहेत. बेरोजगारीचा प्रश्न, भाजपनेच निर्माण केलेला भ्रष्टाचार, देशातील सर्व भ्रष्ट लोकांना भाजपने दिलेला प्रवेश, यावर मोदी बोलत नाहीत. ते विरोधकांवर अत्यंत खालच्या शब्दांत बोलतात. पंतप्रधानपदावरील व्यक्तीचे इतके अधःपतन देशाने कधीच बघितले नव्हते," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. "महागाईत होरपळून निघालेल्या सामान्य लोकांशी मोदी यांचे नाते तुटले आहे. अनेक प्रांतांत जातीची मते मिळावीत म्हणून मोदींनी ‘भारतरत्न’ किताबाची खैरात वाटून या पदव्यांचे अवमूल्यन केले. मोदींनी रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवले असा अपप्रचार त्यांचे भक्त करतात, पण इतक्या शक्तिमान मोदींना आपल्या देशातील तरुणांना नोकऱ्या देता आल्या नाहीत. कारण मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. देशातील व्यापारी वर्ग कर व दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच," असंही राऊत यांनी 'सामना'मधील लेखात म्हटलं आहे.


देशाची लोकशाही कायमची इतिहासजमा होईल


"काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व लोकसभा उमेदवार जाहीर केले. भाजप, मिंधे-अजित पवारांची आघाडी अद्यापि चाचपडत आहे. महाराष्ट्रातील निकाल देशाचे राजकीय चित्र बदलतील असे वातावरण आहे. महाराष्ट्रात भाजप 45 प्लस जागा जिंकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस व्यक्त करतात. मोदी देशात चारशेवर जागा जिंकण्याची गर्जना करतात. ते अजिबात शक्य नाही. मोदी हे पुन्हा पंतप्रधान होत नाहीत हे नक्की. हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकून मोदींना देशातील संसदीय लोकशाही नष्ट करायची आहे, राष्ट्राध्यक्ष पद्धत लादून राज्य करायचे आहे व हे एकदा झाले की देशाची लोकशाही कायमची इतिहासजमा होईल. हे घडू द्यायचे काय?" असा सवाल राऊत यांनी लेखाच्या शेवटी विचारला आहे.