Uddhav Thackeray On CM Shinde: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटावर टीकास्त्र सोडलं. 'तिकडे एकटाच आहे आणि इकडे एकनिष्ठ आहे. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तुम्ही त्याला शिवसेना पक्षप्रमुख करणार आहात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला. डोक्यांचा नाही खोक्यांचा आहे. ५० खोक्यांचा हा खोकासूर आहे..धोकासूर आहे.", अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 


"वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो.", अशीही टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.


"मी सांगतो शांत राहा, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा.",असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.