शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरेंचं कर्जमाफीवर वक्तव्य
शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून
पुणे : शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून, शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पिककर्जमाफी देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता 2 लाखांच्या पुढील पिककर्जदारांच्या कर्जमाफीवर विचार केला जाणार आहे आणि लवकरच सर्वांचा सातबारा कोरा करू, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची नाराजी दूर होणार
अनुदानित पिककर्जाची मर्यादा ही 3 लाखांपर्यंत आहे, तेव्हा 3 लाखांपर्यंत पिककर्ज घेणाऱ्या सर्वच पिककर्जदार शेतकऱ्यांचा यात समावेश असावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. फक्त 2 लाखापर्यंत पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, अशी घोषणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मात्र ही नाराजी दूर करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारकडून लवकरच केलं जाईल असं दिसून येत आहे, कारण 2 लाखांच्या पुढे पिककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही लवकरच विचार करू आणि त्यांचा सातबारा नक्की कोरा करू, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात म्हटलं आहे.
नियमित पिककर्ज भरणाऱ्यांचाही विचार करू
तसेच नियमित पिककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काय चूक केली, त्यांनाही नियमित पिककर्ज भरण्याचा फायदा देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.