सरकारची `लाडका मित्र` योजना; मुंबईला `अदानी सिटी` करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Uddhav Thackeray: धारावीकरांना जागेवरच 500 चौफुटाचे घर मिळाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषेद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या योजनांवर जोरदार टीका केली आहे. तसंच, धारावीच्या पुर्नविकास प्रकल्पावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. मुंबईला अदानी सिटी बनवायचे काम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाईदेखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे.त्यांना वाटतंय की योजनांना लोक भुलतील. फसव्या योजन्यांच्या धुरळ्यामागे ते कॉन्ट्रेक्टर मित्रांचं चांगभलं करु इच्छितात.आता मी लाडका उद्यागपतीवर बोलणार आहे. एकाही धारावीकरांना तिथून हाकलू देणार नाही. गेल्या वर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता.आमची मागणी आहे की, तिथेच धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फुटांचे घर मिळालंच पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबईला अदानी सिटी बनवण्याचे काम सुरू आहे.मुंबईत लुटून भिकेला लावायचे यांचे काम सुरू आहे. टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी अदानीला दिल्या जातायत.५९० एकरची जागा आहे. आता एफएसआयचा वर्षाव सुरू केलाय. धारावीकरांना अपात्रतचे निकष लावून बाहेर काढले जातायत. नागरी संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.कुर्लाची मदर डेअरी,दहीसर टोलनाका, मुलूंडची जागा, मिठागरेसह २० जागा अदानीला दिल्या जातायत. लाडक्या मित्रासाठी जागा दिल्या जात आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.
धारावी केवळ झोपडपट्टी नसून तिथे एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरांत मायक्रोस्केल उद्योग चालतो. त्यात कुंभार आहेत. चामडे उद्योग आहेत. मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार आहेत. उद्या कदाचित मुंबईचं नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासियांना उद्ध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचं कारस्थान आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे घेणार विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक...
राज्यातील सर्व विधानसभा संपर्कप्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.यामध्ये उद्धव ठाकरे संपर्कप्रमुखांना मार्गदर्शन करणार असून मागच्या आठवड्यात वरिष्ठ नेत्यांची बैठक हॉटेलमध्ये पार पडली होती.त्यानंतर आज संपर्कप्रमुखांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 जुन रोजी विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली होती त्यावेळी आढावा घेऊन विधानसभेतील अहवाल उद्धव ठाकरे यांनी मागितला होता.