Uddhav Thackeray Shivsena Demand Of CM Candidate: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण या प्रश्नावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पत्रकारांना उत्तर दिलं होतं. संख्याबळाच्या आधारे नेता निवडू अशा आशयाचं विधान पवारांनी केलं होतं. या विधानानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी करणारा उद्धव ठाकरेंचा पक्ष थोडा बॅकफूटवर गेला होता. मात्र आजच्या 'सामना'मधून ठाकरेंच्या पक्षाने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर कराच अशी गळ घातली आहे.


बिनचेहऱ्याने निवडणुकांना सामोरे जाणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील' या फडणवीसांच्या विधानावरुन ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाही हे फडणवीसांचे मत आहे. मुळात फडणवीस यांचे गुप्तहेर व राजकीय आकलन तोकडे पडत आहे. त्यांच्या छचोर चाणक्यगिरीचा बाजार उठल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचेच नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, मी त्यास पाठिंबा देतो, असा खुला आवाज ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांसमोर दिला. कारण बिनचेहऱ्याने निवडणुकांना सामोरे जाणे अडचणीचे ठरेल. शरद पवार, नाना पटोले वगैरे नेत्यांनी आपापल्या पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव संमतीने पुढे करावे, शिवसेना त्यास पाठिंबा देईल. असे विधान करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे हे कौतुकास पात्र आहेत," असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.


गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख...


"संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे ठरते. याच संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने तीन निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार पाडले ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण हे शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल यास खतपाणी घालणारे होते. फडणवीसांनी तेच केले व आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार हे निश्चित आहे. हा खेळ महाविकास आघाडीत रंगू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घेतली. मात्र त्यामुळे फडणवीस यांच्या पोटातली कळ ओठातून बाहेर पडली. महाविकास आघाडीचा चेहरा कोण? यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी निकाल दिला आहे. महाराष्ट्राचे जनमानस वेगळे व नेत्यांच्या मनात वेगळे असे होणार नाही," असा शब्द पक्षाच्यावतीने या लेखातून देण्यात आला आहे.


नक्की वाचा >> शिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'


ठाकरेंच्या पक्षाने दोन्ही काँग्रेसमधल्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली


"सगळेच पक्ष रोज सर्वेक्षणे वगैरे करून निर्णय घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचा कौल त्यांच्यापर्यंत पोहोचलाच असेल. काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे," असा खोचक टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.