Maharashtra Politics : ठाणे (Thane) म्हणजे शिवसेनेचा हक्काचा गड, शिवसेनेचा (Shivsena) जन्म जरी मुंबईत झाला असला तरी सेनेच्या सत्तेची बिजं खऱ्या अर्थानं रोवली गेली ती ठाण्यात. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याही सुरूंग लागलाय. ठाणे महापालिकेतील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचा हात धरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) हा आणखी एक मोठा झटका मानला जातोय. ठाण्यात आता उद्धव गटाचा एकच नगरसेवक उरलाय. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. 


शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यावर मजबूत पकड आहे. आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांनी ठाण्यात शिवसेनेला नवी उभारी दिली. 1986 ते 2017 या काळात ठाणे महापालिकेची सात वेळा निवडणूक झाली. या 31 वर्षांतील 24 वर्षे शिवसेनेची सत्ता राहिलीय. विशेष म्हणजे 2017 मध्ये 67 जागा जिंकून शिवसेनेनं पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवण्याचा विक्रम केला. 


एकनाथ शिंदेंनी आपले नेतृत्वगुण दाखवत ठाण्यात शिवसेना जाळं विणलं. या जाळ्याची वीण इतकी घट्ट होती की कोणत्याही पक्षाला हे जाळं आजवर तोडता आलं नाही. त्यामुळे शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांना मानणारा मोठा वर्ग आपसूकच त्यांच्याकडे झुकला. त्यामुळे आता बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालीय.