...म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य
Maharashtra Politics : बाबरी कुणी पाडली? बाबरी अशीच पडली? शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली आणि बाबरी पाडली असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा का दिला याचा खुलासा केला आहे. तसेच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला (maharashtra politics).
शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा
नाशिकमध्येही शूर्पनखेला श्रीरामांनी इथेच ठार केले होते. जेव्हा त्यांना 14 हजार राक्षस मारायला आले होते तेव्हा त्यांचा वध इथेच करण्यात आला. अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि पंचवटी ही पराक्रमभूमी आहे. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे, शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही
राम मंदिर बनविण्यासाठी, 370 कलम काढण्यासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येकवेळी भाजपला पाठिंबा दिला. ईडी, सीबीआय, आयटी हे तुमचे घरगडी आहेत. आमच्या निर्दोष शिवसैनिकांच्या घरावर धाडी घालतायत. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. हे सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर खुर्ची सोडून द्या, आम्ही सक्षम आहोत.
दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं?
महाराष्ट्र्र संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. देश के लिए ‘मन की बात’ आणि गुजरात के लिए ‘धन की बात’! ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा. पंतप्रधान मोदी देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. हे हिंदुत्व नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय? संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघाले
मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षात केलं काय? ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली, त्यांना तुम्ही संपवायला निघालायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.