उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील अधिवेशनाला हजेरी लावली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा पहिला मुख्यमंत्री पाहिला असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. जसजसं अधिवेशन पुढे सरकत आहे तसंतसं आम्ही जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडू असं यावेळी ते म्हणाले आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांवर किती गंभीर आहात अशी विचारणाही त्यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा पहिला मुख्यमंत्री पाहिला. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या घरावर नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन आहेत असंही यावेळी ते म्हणाले.  


"तुम्हाला स्वच्छता करायची असेल तर आपल्या सहकाऱ्यांपासून सुरु करा. जे आरोप केलेले डागी सहकारी आहेत त्यांची स्वच्छता करावी. समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी पालिका समर्थ आहे. आम्ही 25 वर्षं पालिका पाहत आहोत, यापुढेही पाहू. जर मुख्यमंत्र्यांकडे स्वत: समुद्र स्वच्छ करण्याची वेळी आली असेल तर प्रशासन काय करणार?," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


"एक रुपयात वीमा योजनेचा परिणाम असा झाला की, 80 ते 90 लाख शेतकरी वीमा घ्यायचे, तो आकडा आता पावणे दोन कोटींच्या घऱात गेला आहे. 8 हजार कोटींचा जो शेतकऱ्याचा हिस्सा होता तो सरकारने भरला. पण तो पैसा जनतेचा होता. हा पैसाही त्यांच्या मित्रांच्या कंपन्यात गेला का हे त्यांनी सांगितलं पाहिजे. 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचं कळवा अशी वीमा कंपन्यांची अट आहे, पण त्यानंतर त्यांचे फोन, दारं बंद आहेत. 8 हजार कोटी कुठे गेले हे सांगावे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


"सध्या शेतकऱ्यांना वाली कोणीच नाही म्हणून शेतकरी अवयव विकण्यासाठी मुंबईत आले होते. सरकारच्या पदाधिकाऱ्यांकडून गुंडागर्दी सुरू आहे. सध्या पत्राचा जमाना सुरू आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहेय. दोनही उपमुख्यमंत्री सभागृहात दोघांच्या बाजूला बसतात, पण तरीही पत्रं लिहावं लागतं," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 


"भारतीय जनता पक्षाच्या भावना देशासाठी एवढ्या ऊतू जात आहेत. जो न्याय नवाब मलिक यांना लागू होतो तोच न्याय प्रफुल पटेल यांनाही लागू होतो. त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 370 कलम हटवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आहे. आता मोदींनी काश्मिरी पंडितांची गॅरंटी घ्यावी असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.