Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला... ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, असं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलंय.. शंकराचार्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान केला.. यावेळी शंकराचार्यांनी हे वक्तव्य केलं. माझं राजकारणाशी देणंघेणं नाही, सत्य तेच बोलतो, असं ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र, या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठं राजकीय नाट्य घडलं. शिवसेना ठाकरे गटाचे केवळ 16 आमदार आहेत. विजयासाठी 23 मतांची गरज होती. उर्वरित 7 मतांसाठी नार्वेकर काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून होते. ही मतं पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मिलिंद नार्वेकरांना मतं द्यायची की, शेकापच्या जयंत पाटलांना? यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले. पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नाना पटोलेंनी ठाकरेंच्या बाजूनं कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जयंत पाटलांना मतं देण्याच्या बाजूनं होतं. ज्या 8 आमदारांचा कोटा काँग्रेसनं ठरवून दिला त्या आमदारांवर ठाकरेंचा विश्वास नव्हता. ते आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि नार्वेकरांना दगाफटका होईल, अशी भीती ठाकरेंना वाटत होती.


ठाकरेंच्या शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या 8 आमदारांची यादी दिली. मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली. या बैठकीत जोरदार वादावादी झाली.  निकाल विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिली. मतदानाच्या आदल्या रात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले.  मात्र, उद्धव ठाकरे पवारांसाठी नॉट रिचेबल राहिले, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.


दरम्यान, असं काहीही घडलं नाही.. महाविकास आघाडीत कसलीही धुसफूस नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटानं केलाय..अखेर शिवसेना ठाकरे गटाला ज्याची भीती होती, तेच घडलं... काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. त्यामुळं जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार पराभूत झाले... ठाकरे गटाचे नार्वेकर आमदार म्हणून विजयी झाले... मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतल्या एकीला तडे गेल्याचं स्पष्ट दिसतंय...