उष्णतेत राज्यकर्त्यांची सिंहासनं जळून खाक होतील- उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा घेतली.
पुणे : 'परिस्थिती बिकट आहे, वातावरण तापलेलं आहे, ही उष्णता राज्यकर्त्यांनी ओळखावी, नाहीतर त्यात त्यांची सिंहासन जळून खाक होतील' असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. राजगुरुनगर शहरातील नविन पुलाचं उद्घाटन तसेच हुतात्मा राजगुरु, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या पुतळ्यांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ही सभा पार पडली.
पंतप्रधान शिर्डीत म्हणाले २०३० पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार, अशा थापा मारायच्या आणि मत मिळवायचे असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.
स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते, पण आज जे काही चाललंय त्याला स्वराज्य म्हणता येईल का ? असा सवाल उद्धव यांनी केला. दुष्काळ दुष्काळ म्हणत असताना नुसताच योजना आणि थापांचा पाऊस आहे. गाजराच्या शेतीला मतांचं पाणी नका घालू असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीवर निशाणा
दुष्काळात धरणं सुकली, राष्ट्रवादी वाल्यांना तिकडे फिरकू देऊ नका.त्यांच्या काकांचा राफेल व्यवहारावा पाठिंबा आहे की नाही, ते त्यांच्या काकांनी सांगावं
बारामतीत मोदी गेले तेव्हा पवारांना गुरु म्हणाले होते, हेच गुरु शिष्याचं नातं का? असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधलायं.
'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. केवळ आकडेवारी सांगातली जाते, ती फसवी आहे असे सांगत मी सर्वसामान्यांची बाजू मांडतो, ते सरकारच्या विरोधात असेल तर आहे मी सरकारच्या विरोधात असल्याचे'ही उद्धव ठाकरे म्हणाले.