उद्धवजींचं `लॉलीपॉप`... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
कोल्हापूर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा खरा असल्याचं म्हटलंय. तसेच आमदार नाराज असण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलय. फडणवीस यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पाची चिरफाड केली. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला जातोय हेसमोर आणलं त्यामुळे आमदार नाराज आहेत.
आघाडी सरकारमधील आमदार अस्वस्थ असल्यामुळे त्यांना पाच कोटी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 हजार कोटी रस्त्यांसाठी दिले, पण, त्यामध्ये विकास कामे न होता फक्त बिले काढले जातील. पैसे देऊनही शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. कारण निधीवाटपात असमानता आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
25 आमदार नाराज असल्याचं दानवे काही चुकीचं बोलले नाही. निधीवाटपात असमानता असल्यामुळे नाराज आमदारांना थोपविण्यासाठी सगळा आटापिटा सुरू आहे. शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंकडे जाऊन खदखद मांडतात. उद्धवजी त्यांना लॉलीपॉप देतात. त्यानंतर सगळं शांत होतं, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही राजू शेट्टींना आवाहन केलं आहे. आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि हे भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी आम्हाला आमदारांना आवाहन करावं लागेल. आम्हाला कोणी बांधलेल नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
एमआयएम महाविकास आघाडी सोबत गेली तरी काहीच फरक पडणार नाही. आमची एवढी भीती निर्माण झाली आहे की एकमेकांचे हात घट्ट धरायचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सहयोगी पक्ष मिळून महा विकास आघाडीला टक्कर द्यायला समर्थ आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.