उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?
उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.
Ujjwal Nikam : पूनम महाजन... उत्तर मध्य मुंबईच्या दोन टर्म खासदार... भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. 2024 ला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी त्यांना होती. मात्र भाजपनं त्यांचा पत्ता कापला आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली. पक्षाच्या या निर्णयानंतर पूनम महाजनांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
10 वर्षं लोकसभा खासदार या नात्यानं उत्तर मध्य मुंबईची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद ! एक खासदार म्हणून नाही, तर मला मुलीप्रमाणं मतदारसंघातील जनतेनं प्रेम केलं. त्याबद्दल जनतेची ऋणी राहिन आणि आपलं हे नातं कायम राहिल. माझे आदर्श, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी 'राष्ट्र प्रथम, मग आपण' असा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गानं चालण्याची शक्ती ईश्वरानं द्यावं अशी प्रार्थना करते.
दरम्यान, त्यांना तिकीट नाकारून भाजपनं महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याची टीका संजय राऊतांनी केली. तर, पूनम महाजनांवर नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असेल असा दावा उज्ज्वल निकमांनी केला आहे.
पूनम महाजन गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या कार्यक्रमात दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियात जोरदार पोस्टरबाजी केली. उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक असल्याचं मानलं जात होतं. भाजपनं निकमांना उमेदवारी दिल्यानं त्यांची ती इच्छा अधुरीच राहिलीय... आता भविष्यात पूनम महाजन काय करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष असणाराय.
उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी
उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत भाजपनं महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याची टीका संजय राऊतांनी केलीये.. उज्ज्वल निकम यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती असंही राऊत म्हणालेत... तर महाजन यांना नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असेल असा दावा उज्ज्वल निकम यांनी केलाय..