चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : थकीत मालमत्ता कराची वसूली होत नाही, तोपर्यंत कर विभागातल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, अशी कडक भूमिका उल्हासनगर महापालिकेनं घेतली आहे. त्यामुळं तब्बल १४० कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगारच मिळाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर शहरात आजमितीला १ लाख ७७ हजार ५१७ मालमत्ता आहेत. मात्र ९०० कोटींचं बजेट असलेल्या या महापालिकेत मालमत्ता कराची थकबाकी बजेटच्या अर्धी, म्हणजेच तब्बल ४५० कोटी इतकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मागील दोन वर्ष कर्मचाऱ्यांना प्रशासनानं प्रोत्साहन देऊन पाहिलं, पण कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे यंदा अवघी ४ कोटींचीच वसूली झाली. 


प्रत्येक लिपिकाने दिवसाला १ लाख रुपयांची करवसूली करण्याचे सक्तीचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले, मात्र तरीही फरक न पडल्यामुळे अखेर या महिन्यापासून जर वसूली केली तरच पगार मिळेल, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. त्यामुळं कर विभागातल्या १४० कर्मचाऱ्यांना या महिन्यात पगारच मिळालेला नाहीये. विशेष म्हणजे कर विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनीच हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. त्यामुळं आता कर विभागातल्या कामचुकार कर्मचाऱ्यांची मात्र मोठी गोची झाली आहे.