महिलेबरोबर झालेल्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, आरोपीकडून भयंकर कृत्य
मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून साडेचार वर्षाच्या मुलाबरोबर भयंकर कृत्य
चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने त्या महिलेच्या साडेचार वर्षांच्या मुलाबरोबर भयंकर कृत्य केलं. या घटनेनं एकच खबळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील हनुमान नगर परिसरात 24 वर्षीय आरोपी कांचनसिंग पासी आणि मृत मुलाचं कुटुंब वास्तव्याला आहे. पीडित मुलाची आई आणि कांचन सिंग हे दोघेही एका बिस्किटाच्या कारखान्यात एकत्र कामाला होते. 16 एप्रिल रोजी कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणं झालं.
याचा राग मनात धरून 20 एप्रिलला आरोपी कांचनसिंग याने त्या महिलेल्या साडेचार वर्षांच्या मुलाला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेलं आणि अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात एका झुडपात नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून कांचनसिंग हा उत्तर प्रदेशात पळून गेला.
मुलगा बेपत्ता झाल्याने मुलाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. तर दुसरीकडे अंबरनाथ पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह ऑर्डनन्स परिसरात आढळून आला. हा मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
पोलिसांच्या तपासात मुलाच्या आईचं आरोपी कांचनसिंग याच्यासोबत चार दिवसांपूर्वी भांडण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी कांचनसिंगचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांच्या टीमने उत्तर प्रदेशात जाऊन प्रयागराज इथून कांचनसिंग पासी याला ताब्यात घेतलं.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपणच या साडेचार वर्षांच्या मुलाची गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला सध्या 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.