फुगा मारल्याचा जाब विचारला, मारहाणीत डोळा थोडक्यात बचावला
क्लासमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा डोळा या हल्ल्यात थोडक्यात बचावला
उल्हासनगर : देशासह राज्यात तब्बल दोन वर्षांनी होळी साजरी होत आहे. संपूर्ण राज्यात उत्साहाच वातावरण आहे. पण उत्साहाच्या भरात काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पाण्याने भरलेला फुगा मारण्यावर बंदी असतानाही अनेक जण रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर फुगे मारतात. यातून मुली, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचीही सुटका नसते. अनेकवेळा दुर्घटना घडते, अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीला काही मुलांनी बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्य समोर आली आहे.
जयेश गिझलानी हा विद्यार्थी कोचिंग क्लासेसहून घरी जात होता. यावेळी काही मुलं रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाण्याने भरलेले फुगे मारत होते. यातील एका मुलाने जयेशच्या अंगावर फुगा मारला. फुगा का मारला याचा जाब जयेशने विचारला. पण जाब विचारल्याने संतापलेल्या टोळक्यातील एका मुलाने जयेशला बेदम मारहाण केली.
त्या मुलाने हातातल्या चावीने जयेशला मारहाण केली. यात जयेशचा डोळा थोडक्यात बचावला. पण डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने जयशेला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या घटनेची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तरुणाल पकडून पोलीस स्थानकात आणलं. पण धक्कादायक म्हणजे मारहाण करणारा तरुण पोलीसांची नजर चुकवून पोलीस स्थानकातूनच पसार झाला. सध्या पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.