उल्हासनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात असंतोषाचं वातावरण आहे. राज्यभर संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, उल्हासनगरात मोठी घटना घडली आहे. शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीप रामचंदानी असं मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवकाचं नाव असून ते उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आहेत. रामचंदानी हे आज दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर आले असता अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना खाली पाडून मारहाण केली. आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासलं.


मारहाण करण्यासाठी आलेले कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून आल्याचं या घटनेचा व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. या घटनेनंतर आपण शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी केल्यामुळे त्यांनी दडपशाही करण्यासाठी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तालिबानी राज्य असल्याची टीकाही रामचंदानी यांनी केली आहे. 


या घटनेनंतर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता, त्यांनी प्रदीप रामचंदानी हे सातत्याने शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधात बोलत असल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिल्याचं राजेंद्र चौधरी यांनी सांगितलं. हा हल्ला शिवसैनिकांनीच केल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलं.