चिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य - नारायण राणे
कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय.
कुडाळ : कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय. तर चाचणी डीजीसीएच्या परवानगीनुसारच, घेतल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलाय.
चिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. हवाई चाचणीची परवानगी पैसे देऊन मिळवली असल्यांचही त्यांनी म्हटले आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राणेनी हे गंभीर आरोप केले आहेत.
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गणपतीच्या आगमनाच्या आधी एक दिवस चिपी विमानतळावर हवाई चाचणी यशस्वी घेतली. तर व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी कसलीही अडचण नाही, असा निर्वाळा पहिले विमान उतरवणाऱ्या वैमानिकाने केलाय. चिपी विमानतळ उत्तम आहे. लँडींगसाठी विमानतळ उत्तम असून व्यावसायिक उड्डाण आणि लँडींगसाठी हे विमानतळ योग्य असल्याची प्रतिक्रिया वैमानिकाने व्यक्त केली.
पर्यटनासाठी नंदनवन मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला. बहुचर्चित चिपी विमानतळावर पहिली हवाई चाचणी यशस्वीपणे पार पडली. चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमानाने उड्डाण केलं आणि गोव्या मार्गे विमान सिंधुदुर्गात दाखल झालं. पहिल्या विमानाने विमानतळावर लँडींग केल्यावर सिंधुदुर्गवासीयांनी टाळ्यांचा कडकडाट करून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
विमान दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानापाशी जाऊन विमानात ठेवलेली गणेशमूर्ती मोठ्या सन्मानाने बाहेर काढण्यात आली. आणि वाजत गाजत विमानतळावर आणण्यात आली. दीड दिवसांच्या या बाप्पाचं विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सिंधुदुर्गवासीय मोठ्यासंख्येनं विमानतळावर यावेळी उपस्थित होते.