Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्या कारला अपघात झाला आहे. सातारामधील वाईजवळ हा अपघात घडला. यात सुदैवाने रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झालेली नाही. (Ramdas Athawale Car Accident in Satara)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले हे साताऱ्यातून मुंबईला परतत होते. त्यावेळी त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला. पण सुदैवाने या अपघातात रामदास आठवले किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 



गाडीच्या इंजिनचे मोठे नुकसान- रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया


या अपघातानंतर रामदास आठवले यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यात त्यांनी या अपघातावेळी नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर माहिती दिली. "मी काल महाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. रात्री 9 पर्यंत मी महाडमध्ये होते. त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रवाना झालो. मी तिथे मुक्काम केला आणि त्यानंतर मी वाईमध्ये गेलो.


संध्याकाळी 6 ते 6.15 च्या दरम्यान वाईतून मुंबईत येत असताना खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढण्यात येत होते. त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. यादरम्यान माझ्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या कारने कंटेनरने धडक दिली. मी ज्या कारमध्ये बसलो होतो, त्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण तरीही कार जोरात आदळली. यात आमच्या गाडीच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आई होती. सुदैवाने आम्ही सगळे सुखरुप आहोत", असे रामदास आठवले यांनी सांगितले.