`कुटुंब सांभाळता येत नाही, ते देश काय सांभाळणार?`
हेच जमत नसेल तर...
नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं वक्तव्य सध्या राजकारण विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या व्यक्तीला आपलं घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार असं वक्तव्य गडकरी यांनी केलं. पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. जर त्यांना हेच जमत नसेल तर, ते देशही सांभाळू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
'मी अशा अनेकजणांना भेटलो आहे जे भाजप आणि देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहेत. अशाच व्यक्तींपैकी एकाला मी विचारलं तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? आपलं दुकान चालत नसल्यामुळे ते बंद केल्याचं सांगत कुटुंबात पत्नी आणि मुलं असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली', असं ते म्हणाले.
कुटुंब आणि कामाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकत त्या व्यक्तीला गडकरींनी प्रथम घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत कुटुंब सांभाळण्याचा सल्ला दिला. प्रथम कुटुंबाचा सांभाळ करत, मुलांचं योग्य मार्गाने संगोपन करत त्यानंतरच पक्ष आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करा, असं आपण त्या व्यक्तीला सांगितल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या नितीन गडकरी यांची एकंदर भूमिका पाहता त्यांची ही सूचक वक्तव्य बऱ्याच चर्चांना वाचा फोडत आहेत. काही दिवसांपूर्वीच जनतेला स्वप्न दाखवत ती पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास अशा नेते मंडळींना जनता चांगलाच दणका देते अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. राजकीय धोरण, आगामी लोकसभा निवडणुका आणि पक्षातील एक अनुभवी नाव म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांची ही वक्तव्यसुद्धा बरीच लक्षवेधी ठरत आहेत.