Peacock Who Comes To Meet Old Women In Malvan Village: प्रेमाला भाषा नसते असं म्हणतात. प्रेम दिलं की तितकं प्रेम परत मिळतं असंही म्हटलं जातं. बरं मुक्या प्राण्यांवर केलेलं प्रेम ते निर्व्याज परत करतात असंही अनेकजण म्हणतात. याची अनेक उदाहरण यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. मग ते हत्ती आणि महुतामधलं नातं असो किंवा पाळीव कुत्रा आणि त्याच्या मालकामधलं नातं असो. मात्र सध्या कणकवलीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील आजींची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामागील कारण आहे या आजींना रोज भेटायला येणारा मोर!


नेमक्या कुठे राहतात या आजी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर मोर हा पक्षी शहरातील लोकांसाठी फार दुर्मिळ दर्शन देणारा पक्षी आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्यापैकी अनेकजण तर असे आहेत ज्यांनी अजूनही प्रत्यक्षात कधी मोर पाहिलेला नाही. मात्र कोकणातील कणकवलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या असरोंडी गावातील एका आजींच्या घरी दररोज एक मोर त्यांची भेट घ्यायला येतो. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर खाली या मोराच्या भेटीचा व्हिडीओ आहे तो पाहिल्यावर तुमचा यावर नक्कीच विश्वास बसले.


कोणी शूट केलाय हा व्हिडीओ?


इन्स्टाग्रामवर सक्रीय असलेल्या अमोल सावंत या तरुणाने या आजी आणि मोराच्या भेटीसंदर्भातील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमोलने या व्हिडीओमध्ये हा मोर आजींना भेटायला का येतो याची रंजक गोष्ट सांगितली आहे.


का रोज भेटायला येतो?


तर या आजींचं घर जंगलाच्या फार जवळ आहे. आठ वर्षांपूर्वी या आजींनी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना खायला घातलेले दाणे खाण्यासाठी एक मोराचं पिल्लू आलं. ते पिल्लू या कोंबड्यांसाठी टाकलेले दाणे खाऊ लागलं. तेव्हापासूनच जेव्हा जेव्हा आजी कोंबड्यांसाठी दाणे टाकतात तेव्हा तेव्हा हा मोर तिथं येऊन हे दाणे खातो, असं अमोलने व्हिडीओत सांगितलं आहे. याधूनच आजी आणि या मोराचं अनोखं नातं निर्माण झालं आहे. 


इतर लोक आल्यावर पळून जातो हा मोर


खरं तर अमोलनेही जंगलातील मोर पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिला. आजीने अमोलला दिलेल्या माहितीनुसार, इतर लोक आल्यावर हा मोर जंगलात पळून जातो. मात्र अमोल तिथे भेटीसाठी गेला असता हा मोर पळून गेला नाही आणि त्याचं मनमोहक रुप आणि आजीबरोबरच्या गप्पा कॅमेरात कैद करता आल्या. 



अनेकांनी केलं कौतुक


अनेकांनी कमेंट करुन आजी आणि मोराचं नातं असेच टिकून राहू दे असं म्हटलं आहे. हे नातं फार गोड असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी हे फक्त कोकणातच होऊ शकतं असं म्हटलं आहे. प्रत्येक कोकणी माणसाला अभिमान वाटावा असा हा व्हिडीओ असल्याचं एकाने म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आणि या आजी-मोराचं नातं कसं वाटलं कमेंट करुन नक्की सांगा.