असमाधानकारक पावसामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या; भाज्या आणि शेतमालाच्या किंमती कडाडणार
राज्यभरात केवळ 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. असमाधानकारक पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे येत्या काही दिवसांत शेतमालाचा तुटवडा भासणार आहे. तसंच भाज्या आणि इतर शेतमाल महागणार आहे.
मुंबई : राज्यभरात केवळ 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. असमाधानकारक पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे येत्या काही दिवसांत शेतमालाचा तुटवडा भासणार आहे. तसंच भाज्या आणि इतर शेतमाल महागणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी खरीप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. राज्यातल्या पेरणीची स्थिती समाधानकारक नाही अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा कमी झाला असून सध्या जेमतेम 21 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात सध्या शेकडो गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्हात अद्यापही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं शेतकरी आतुरतेने पावसाची वाट बघतायेत. पावसाअभावी पेरण्या देखील खोळंबल्यात. ज्या शेतक-यांनी कापुस पेरून ठेवलाय, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट आलंय.
समाधानकारक पाऊस न झाल्याने ठाण्याच्या अंबरनाथ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडलीय. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 10 ते 15 दिवसांपूर्वी भात बियाणे पेरली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात भाताची रोपे करपू लागली आहेत. अजून काही दिवस अशाच प्रकारे पावसाने पाठ फिरवली तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.
चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यात पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पेरलेली बियाणं नष्ट होण्याची भीती आहे. पुढील 4 - 5 दिवसांत अपेक्षित पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे शेतक-यांनी केलेला खर्च निघणंही कठीण होईल. विमा रक्कम मिळत नसल्यानं संकटात भर पडली आहे.