Unseasonal Rain In Nagpur: महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. राज्यात सध्या संमिश्र वातावरण आहे. नागपुरला आज अवकाळी पावसाचा तडखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह नागपुरात अवकाळी पाऊस बरसला आहे. नागपुर प्रादेशिक हवामान विभागानेही नागपुरसाठी यल्लो अलर्ट दिला होता. (Nagpur Rain Alert)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसला आहे. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळच्या 9च्या सुमारास झालेल्या पावसामुळं अनेकांची तारांबळ उडाली. दक्षिण भारतात सायकलोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज नागपुर विभागाने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात सध्या उन पावसाचा खेळ सुरू आहे. मागील आठवड्यापासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळं उकाड्यापासून आराम मिळाला असला तरी काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहेत. 25 एप्रिलपर्यंत येथे उकाडा जाणवणार आहे.


हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. विदर्भात वादळी पाऊस, गारपिटी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा इशारा जरी देण्यात आला असला तरी उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.  


कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा 


अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.