मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Mumbai, Maharashtra Unseasonal Rain) अवकाळी पाऊस पडत आहे. हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच गैरसोय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणखी २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात झालेल्या पावसामुळे फळांचा राजा संकटात आला आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यातही पाऊस कोसळत आहे. द्राक्ष, कांद्याला फटका पडला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. मात्र दिवसा गारवा आणि रात्री उकाडा असं चित्र दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमध्येही अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. महाड,  पोलादपूर, कर्जत, खालापूर आणि माणगावला जोरदार पावसानं दणका दिला आहे. आंबा पिकासह कडधान्यालाही पावसाचा फटका बसला आहे. गुरुवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली. महाड, पोलादपूर तालुकयात मुसळधार पाऊस झाला. यावर्षी रायगडला सातत्यानं अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना दणका दिला आहे. 


 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कर्नाटक किनारपट्टीपासून ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तयार झाला आहे. दक्षिण कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे.पुण्यात आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पुण्यात गुरुवारी दुपारनंतर तर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावायला सुरवात केली.


टिटवाळा आणि खडवली भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली. या भागात 15 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला.. या वादळी पावसात अनेक भागात झाडं उन्मळून  पडली.. पावसामुळे या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. 



धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पिंपळनेर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होतंय. जनावरांचा चाराही पावसात भिजलाय. साक्रीसह पिंपळनेरच्या अनेक भागांत हा बेमोसमी पाऊस बरसला. पुढचे 3 दिवसही अनेक भागात धुळ्यासह आजूबाजूच्या परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.