UPSC Exam 2024 Google Map Issue: देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. मात्र अनेक महिने मेहनत घेऊन या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचं छत्रपती संभाजीनगरमधील काही विद्यार्थ्यांचं स्वप्न चक्क गुगल मॅपमुळे भंग पावलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही आज काही केंद्रावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीची परीक्षा पार पडत असून याच केंद्रांवर पोहचण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे मोठा फटका बसला आहे.


गुगलची मदत घेतली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीनगरातील काही केंद्रांवर यूपीएससी परीक्षा पार पडत असून या केंद्रांमध्ये विवेकानंद कॉलेजचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर दाखल झाले. मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विवेकानंद कॉलेज हे केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आहे हे माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. मात्र गुगल मॅपच्या मदतीने परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला अन् इथेच त्यांचा घात झाला.


अनेकांना अश्रू अनावर


गुगल मॅपवर ज्या ठिकाणी परीक्षा आहे त्या केंद्रापासून 11 किलोमीटरचे केंद्र दाखवण्यात आलं. त्यामुळेच गुगल मॅपच्या भरोश्यावर केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली. त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आलं नाही. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहचू शकल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. गुगल मॅपच्या या गोंधळामुळे परीक्षेसाठी एवढ्या दूरपर्यंत येऊनही परीक्षा केंद्रात प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.


2 मिनिटं उशीर झाल्याने प्रवेश नाकारला


इथे येण्याआगोदर गुगलवर सर्च केलं तिथे वाळूज येथे दाखवत आहे. 9 वाजता रिपोर्टींग टाइम होता. साडेनऊला पेपर सुरु होणार होता. सकाळी 9 वाजून 2 मिनिटं तसेच 5 मिनिटांच्या कालावधीत काही विद्यार्थी आले. ते विद्यार्थी आल्याने 2 ते 5 मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. कारण युपीएससीच्या नियमाप्रमाणे 9 वाजता विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश बंद केला जातो, असं सांगण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. अन्य एका विद्यार्थ्याने जालन्यामधून निघताना गुगल मॅपवर लोकेश टाकली असता ती वाळूज पंढरपूरमधील एमआयडीसीमध्ये दाखवण्यात आली. त्याप्रमाणे तिथे पोहचलो असता तिथे कॉलेज नसल्याचं लक्षात आलं, असं सांगितलं. 


थेट पुढच्या वर्षी परीक्षा


युपीएससीच्या नियमाप्रमाणे प्रिलिमची परीक्षा हुकली की थेट पुढच्या वर्षीच परीक्षा देण्याची तरदूत आहे. त्यामुळे आता गुगल मॅपमुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया गेलं आहे.