कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती सारख्या घटना घडल्या आहेत. रायगडमधल्या खालापूर इथल्या इरसालावाडीत दरड कोसळून (Irshalwadi Landslide) 21 जणांचा मृत्यू झालाय. यावेळी बचावकार्य (Resque Operation) सुरु असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अशीच आणखी एक दुर्देवी घटना नवी मुंबईतल्या उरण भागात घडली आहे. उरण पोलीस स्टेशनला काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. एपीआय विशाल राजवाडे (Vishal Rajwade) हे कर्तव्यावार असताना शहिद झाले. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांचा मृत्यू झाला. विशाल राजवाडे यांच्या मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस परिवार या संस्थेनं हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला, विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवार असताना मृत्यू झाला आहे जेवढी शक्य असेल तेवढी मदत या कुटुंबियांना करा, तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबियांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाल राजवाडे यांच्या हळहळ व्यक्त केली. ही घटना वेदनादायी असल्याचं भावना व्यक्त केली.


इरसालवाडी दुर्घटनेत जवानाचा मृत्यू
ायगड जिल्ह्यातील इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेलाय.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अजूनही 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत. आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवण्यात आलंय.  जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येतायत तसंच दुर्गम डोंगराळ भाग असल्यानं कुठलीही मशिनरी पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळा भार मनुष्यबळावरच आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. नवी मुंबई नगर नियमचे अग्निशमन दलाचे सहाय्यत केंद्रीय अधिकारी शिवराम धुमाणे असं त्यांचं नाव होतं. 


इरशालवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. नवी मुंबई प्रशासनाची अग्निमशन गाडी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचली. मात्र बचावकार्य सुरु असताना अनेक अडथळे येत होते. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस असं अशतानाही जवान मोठ्या प्रय़त्नांनी गडावर चढून बचावकार्य करत होते. बचाव कार्य सुरु असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. शिवराम धुमाणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. शिवराम यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालायत घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पण रस्त्यातच शिवराम धुमाणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.