अलिबाग : अचानक वाढलेल्‍या कोरोना बाधित रुग्‍णसंख्‍येमुळे संपूर्ण उरण तालुका रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. उरणमध्‍ये आतापर्यंत कोरोनाचे ६१रुग्‍ण सापडले आहेत. त्यामुळे रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुका रेड झोन म्हणून जाहीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पनवेल पाठोपाठ उरण तालुका देखील रायगड जिल्‍हयातील कोरोनाचा दुसरा हॉटस्‍पॉट बनला आहे. रायगडच्‍या उरण तालुक्‍यात गेल्‍या पाच दिवसात कोरोनाचे तब्‍बल ५४ रूग्‍ण वाढले आहेत. एकूण रूग्‍णांची संख्‍या  ६१ वर जावून पोहोचली आहे. त्‍यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून उरण तालुका रेडझोन म्‍हणून घोषित करण्‍यात आला आहे. 


कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. रायगड जिल्‍हा सध्‍या ऑरेज झोनमध्‍ये असून उरण तालुक्‍याला मात्र रेड झोनचे निर्देश लागू होतील, असे आदेश देताना जिल्हाधिकारी चौधरी यांनी म्हटले आहे. अचानक वाढलेले रुग्‍ण मागील तीन दिवसातील आहेत. या रूग्‍णांमधील सर्वाधिक रुग्‍ण हे करंजा परीसरातील आहेत . यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे. 


 दरम्यान, मुंबईतून कोरोना विषाणूचा प्रसार हा रायगडच्या ग्रामीण भागात झाला आहे. तळा तालुक्यात  कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. धारावीतून आलेल्या तरुणामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ३१७ वर पोहोचली आहे.


तळा तालुक्यातील तळेगाव येथे मुंबईतील धारावी येथून आलेल्या २० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला आता कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .  जिल्ह्यात आतापर्यंत  १०३ रुग्ण पूर्ण बरे झाले तर २०४ जणांवर उपचार सुरु आहेत . आतापर्यंत १० रुगणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.