पुणे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा रोखठोकपणा सर्वांनाच माहिती आहे. रोखठोक शब्दांत ते विरोधकच काय स्वपक्षीयांनाही सुनवायला कमी करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या नगर विकास खात्यावरूनही गडकरी यांनी राज्य सरकारला चांगलाच घरचा आहेर दिला. 'नगर विकास खाते हे ‘होपलेस’ असून अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही', असे गडकरी यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थळ - पुणे. निमित्त - चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन. नितीन गडकरी भाषणास उभा राहीले. त्यांचा नूर जरा वेगळाच होता. विकासावर बोलता बोलता गडकरी थेट नगरविकास खात्यावर आले. जे दस्तुरखूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आपल्या भाषणात गडकरींनी नगर विकास खात्याचा चांगलाच समाचार घेतला. गडकरी म्हणाले, 'नगर विकास खाते हे अत्यंत 'होपलेस' खाते आहे. हे खाते शहराचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावते. इतकी 'भुक्कड' संस्था मी आजवर पाहिली नाही. शहर विकासाचे नियोजन करायचे तर ते, सिंगापूरच्या धरतीवर व्हायला हवे', अशा शब्दात गडकरी यांनी बॅटींग केली. महत्त्वाचे असे की, गडकरी आणि फडणवीस हे उपराजधानी नागपूर या एकाच शहरातून येतात.


दरम्यान, ज्या दुमजली उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन झाले तो उड्डाणपूल पुणे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना रोखण्यासाठी कामी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्यात येत असून, लवकरच त्याचे उद्घाटनही होईल. या योजनेच्या धर्तीवर पुण्यातही मुळा - मुठा जलमार्ग विकसीत झाल्यास वाहतुकीती मोठी समस्या सुटण्यास मदत होईल अशी भावना गडकरी यांनी बोलून दाखवली.