COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद :  सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागतंय. शेतमजुरी करणाऱ्या पालकांकडे आपल्या मुलांना स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी पैसे नाहीयत. परिस्थिती नसली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होत नाही. असाच एक प्रसंग उस्मानाबादमध्ये घडलाय. 


एका इतरांच्या शेतात काम करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील मुलाला स्मार्टफोन नसल्याने शिक्षणापासून वंचित राहाव लागत होतं. मात्र जिद्द आणि चिकाटीने उमरगा तालुक्यातील बेतजवळगा येथील दत्ता गायकवाड यांच्या १३ वर्षीय प्रेमने महिनाभर आई वडिलांसोबत शेतात मजुरी करत त्यातून आलेल्या पैशातून शिक्षणासाठी स्मार्ट फोन घेतलाय. 


कोरडवाहू अडीच एक्कर जमीन त्यात ६ पैकी ४ मुलींच्या लग्नात कर्ज झालेलं आहे. त्यामुळे गायकवाड दाम्पत्य इतरांच्या शेतात शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दररोज मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागवायचा का मुलाला मोबाईल घ्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. 



मात्र जिद्द आणि मेहनतीने शेतात आई वडिलांसोबत जाऊन मजुरी करून १३ वर्षीय प्रेमने शिक्षणासाठी मोबाईल मिळवलाय. प्रेमसारखीच परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे पण ते स्मार्टफोन घेऊ शकत नाही. देशात आणखी किती प्रेम शिक्षणासाठी संघर्ष करतायेत, हा एक मोठा प्रश्न आहे.


यासाठी प्रेमचं कौतूकं करायला गेलं तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे स्मार्ट शिक्षणाची नांदी करणाऱ्या सरकारने ही परिस्थिती समजून घ्यावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.