प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : वायू चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकलं आहे. पण या वादळाचे परिणाम आता किनारपट्टी भागात दिसू लागले आहेत. सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्याने समुद्र प्रचंड खवळला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याला सध्या साडेचार मिटरपर्यंतच्या लाटा उसळताना पहायला मिळत आहेत. या लाटा वेगाने किनारपट्टीवर आदळत असून अजस्त्र लाटांचं तांडव पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील भगवती जेटीवरूनही समुद्राच्या लाटा अशाच पलिकडे जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भगवती जेटीप्रमाणेच जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागातही अशीच स्थिती आहे. तसेच कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हि वाढलेला पहायला मिळत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे कोकण किनारपट्टी भागात उसळणाऱ्या लाटांचं पाणी भरती बरोबर मानविवस्तीत घुसत असल्याच्या घटना देखील काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा असलेलं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना देखील समुद्रावर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली असून मासेमारीसाठी सुध्दा कोणीही समुद्रात जाऊ नसे असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. तसेच किनारपट्टी भागात जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.