कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा
येवा कोकण....
मुंबई : दरवर्षी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची संख्या पाहता या भागातील रस्ते वाहतुकीचे असंख्य प्रश्न तातडीने सोडवले जाण्याचीच मागणी वारंवार केली जात होती. त्याच धर्तीवर आता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारं एक वृत्त समोर आलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ येथील बाह्यवळण पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे ही मार्गिका आता वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्यामुळे आता वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाची पाहणी करून रविवारी याविषयीची माहिती घेतली.
मुंबई- गोवा महामागर्गावर होणारी वाहतून कोंडी हा अनेकांसमोर उभा राहणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच वडखळ नाक्यावरुन होणारी वाहनांची ये-जा पाहता ही समस्या अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पण आता मात्र कांदळेपाडा ते डोलवीपर्यंतच्या बाह्यवळण पुलाचं काम पूर्णत्वास गेल्यामुळे हा त्रास कैक पटींनी कमी होणार आहे.
साधारण दीड किलोमीटर लांबीचा हा पूल एकूण सहा पदरी आहे. ज्यापैकी तीन पदरांचं काम आतपर्यंत पूर्ण झालं आहे. ८० खांबांवर उभ्या असणाऱ्या या पुलावरील तीन पदरांवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. एकंदरच हे चित्र पाहता येत्या काळात कोकणच्या दिशेने वाढणारा पर्यटक आणि चाकरमान्यांचा ओघ पाहता त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब ठरेत असं म्हटलं जात आहे.