नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन डिवचले
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
Lok Sabha Election 2024 : सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलेली टीका प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी चांगलीच झोंबली आहे. ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? अशी पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत वंचितनं प्रणिती शिंदे यांना थेट सवाल करत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इतके दिवस पक्षात थांबल्यानंतरही तुमचं तुमच्या पक्षासोबत का जमत नाही? अशीही विचारणा वंचितनं केलीय.
सोलापूर येथील कार्यक्रमात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली. या टीकेला वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून आमदार प्रणिती शिंदे यांना केला आहे.
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही, असेही यामध्ये म्हटले आहे.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने या ट्विटमधून दिलेला आहे.
वंचित आघाडीवर प्रणिती शिंदे यांनी काय टीका केली होती?
सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टिकास्त्र नाव न घेता सोडल होते. "मागच्या निवडणुकीत काँग्रेसलां कमी मतदान झालं होत. जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो. डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो. म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका," असं यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या.
मागच्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीयगृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक मत घेतली होती. याचा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे ती पराभवाची सल काँग्रेसलां अजूनही खूपत असल्याच प्रणिती शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यामधून दिसून आले. मात्र, वरिष्ठ पातळीवर वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र येण्याबाबत बोलणी सुरु असताना आमदार प्रणिती शिंदे यांची अशी वक्तव्य वंचिताच्या महाविकास आघाडीत प्रवेशासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
मी भाजमध्ये जाणार आहे म्हणून अफवा ही पसरवल्या जातं आहेत. काँग्रेसने जरी मला भाजपमध्ये जा म्हणून सांगितलं तरी मी जाणार नाही,कारण माझ्या रक्तात काँग्रेस आहे .भाजप हा फक्त अदानी आणि अंबानी या दोन लोकांचा वाली आहे .मात्र काँग्रेसचे मायबाप हे लोक आहेत. इथे हुकूमशाही नसून लोकशाही आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.