Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याप्रकरणी (Vanraj Andekar Murder) पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. काल रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून गोळ्या झाडून आंदेकरांची हत्या करण्यात आलीय. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत चौघांना अटक केली. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्या सख्खे मेहुणे आणि बहिणींची नाव आहेत. वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


बहिणीनेच दिली होती धमकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर याचं नाना पेठेत दुकान होतं. पण महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये हे दुकान पाडलं गेलं. त्यानंतर वादाला सुरूवात झाली होती. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. पण दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे आता नाना पेठ परिसरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


पुणे पोलिसांनी बहीण संजीवनीसह आणखी दोघं असं एकूण पाच जणांना अटक केली आहे. 13 जणांच्या टोळक्याने ही हत्या केली आहे. त्यामुळे आता पोलिसांची धडपकड सुरू झाली आहे. गणेश कोमकर याने या अगोदर शिवसेना शहर प्रमुच रामभाऊ पारेख यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. त्यामुळे आता पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.


राजकारण तापलं


पुण्यात झालेल्या गोळीबारानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. पुण्यात खुलेआम लोकांचे मुडदे पाडले जातायेत. राजकीय कार्यकर्त्यांचे बळी दिले जातायेत. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही बोलत नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. तर शिक्षणाचं माहेरघर आता क्राईम कॅपिटल बनलंय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलीय. तर दुसरीकडे  पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.