पिकनिकसाठी रिसॉर्टला गेलेल्या 7 वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू, वसईतील धक्कादायक घटना
सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ती चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Vasai Girl Died In Resort : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता वसईतील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेस या ठिकाणी असलेल्या एचडी रिसॉर्टमध्ये ही घटना घडली.
रिसॉर्टच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेसमधील एचडी रिसॉर्टमध्ये भांडुपच्या गणेश नगर या ठिकाणी राहणारा 14 महिला आणि 4 लहान मुलांचा ग्रुप पिकनिकसाठी गेला होता. यावेळी सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ती चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीक्षा दिनेश जाधव (7) असे स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
रिसॉर्ट मालकावर अद्याप गुन्हा दाखल नाही
यावेळी एचडी रिसॉर्टमध्ये गार्ड उपस्थित नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. वसई पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र याप्रकरणी रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चिमुरडीच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण?
वसई विरार नालासोपारा परिसरातील समुद्र किनाऱ्यावर असे अनेक अनधिकृत रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे जीव देखील गेले आहेत. अनधिकृत रिसॉर्टबाबत अनेक वेळा तक्रारी करुन देखील पोलीस, महापालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच रिसॉर्टमधील सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता या चिमुरडीच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.