ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं बुधवारी सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राजकारणातला एक वजदार नेत काळाच्या पडद्याआड गेलाय. आज दुपारी ३.०० वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. 


ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते. ते राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये असले तरी राजकारणात 'अजातशत्रू' अशी त्यांची ओळख होती. शरद पवारांप्रमाणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांचा स्नेह होता.


शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराची सुरुवात ते दिघे यांच्या टेंभी नाका येथील स्मृतीस अभिवादन करून करायचे... शिवसेनेचा उमेदवार विरोधात असायचा तरी डावखरेंचा प्रचार तिथूनच सुरू व्हायचा. 


डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. 


राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना, यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.