Vasant More Raj Thackeray Phone Call: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या वसंत मोरेंनी जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर आल्याचं म्हटलं आहे. वसंत मोरेंनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा करताना अगदी सुप्रिया सुळेंपासून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचेही फोन येऊन गेल्याचा दावा केला आहे. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोन आला होता. मात्र आपण तो फोन घेतला नाही असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे. आपण राज ठाकरेंचा फोन का घेतला नाही याचं स्पष्टीकरणही वसंत मोरेंनी दिलं आहे.


अनेकांचे फोन आले पण मी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोणाचे कॉल आले? असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला. "कॉल सगळीकडून येत आहेत. मी सगळ्यांना हेच सांगितलं आहे मला दोन दिवस द्या. मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहे," असं वसंत मोरे म्हणाले. पुढे बोलताना वसंत मोरेंनी, " राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोन आला. प्रशांत जगतापांचा फोन आला. अरुण शिंदेंचा फोन आला. मोहनदादांचा फोन आला. शिवसेनेमधूनही फोन आले. सर्वच पक्षांकडून मला संपर्क झाला आहे. मी आताच माझी राजकीय भूमिका जाहीर करणार नाही असं सांगितलं आहे. मला ज्या त्रासामुळे पक्ष सोडावा लागला त्यानंतरही लोक अजूनही शहाणी होत नाहीत. माझ्याबरोबर पक्ष सोडणाऱ्या कार्यकर्त्यांना रात्री अपरात्री फोन करुन धमकावलं जात आहे. या सगळ्या गोष्टीतून स्थिर होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर मी काय ते ठरवेन," असंही स्पष्ट केलं.


लोकसभा लढवणार म्हणजे लढवणारच


"मी लोकसभा लढवणार आहे. दिशा कोणती आणि कशी असेल हे ठरवलं नाही. मी हा सगळा अट्टाहस लोकसभा लढवण्यासाठी केला आहे. मी या हेतूपासून दूर गेलो तर माझ्यासोबत पक्ष सोडणाऱ्यांवर अन्याय होईल," असं म्हणत वसंत मोरेंनी, "माझा पक्ष पुणेकर आहे. पुणेकर दिशा देतील तिकडं मी जाईन. मी जनता दरबारच्या माध्यमातून दारोदारी पोहचलो आहे. जनता माझ्याबरोबर आहे. मला कोणाच्या मदतीची गरज आहे असं वाटत नाही. मी फार विचार करुन हा निर्णय घेतला आहे. माघारी फिरवून मला साहेबांना फसवायचं नाही," असंही ठामपणे सांगितलं.


राज ठाकरेंचा फोन आला पण तो घेतला नाही कारण...


राज ठाकरेंचा फोन आलेला का? मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचा तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला. "भरपूर लोकांचा फोन आला. माननिय साहेबांचा (राज ठाकरेंचा) सुद्धा फोन आला होता एका पदाधिकाऱ्याच्या फोनवर. मात्र त्या पदाधिकाऱ्याला एवढेच सांगितले की, भाऊ मी तुझ्या पाया पडतो. माझी एवढीच विनंती आहे की मला नको साहेबांचा फोन देऊ. मी नाही बोलू शकत," असं सांगितल्याचा दावा वसंत मोरेंनी केला आहे.


नक्की वाचा >> 31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार


मी कधीही खोटं चित्र दाखवलं नाही


"आजपर्यंतची खरी परिस्थिती मी साहेबांच्या कानावर घालत आलो. आता परत साहेबांशी बोलून मला नाही वाटत की मी त्यांना दुखवू शकतो. आता मी निर्णय घेतला आहे तर मी माझ्या आई-बाबांना साक्ष ठेऊन घेतला आहे. राजकीय जीवन सुरु करताना मी शिवसेनेतून काम केलं. मी शाखा अध्यक्षापासून उपविभाग अध्यक्षापर्यंत मी होतो. राज साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा पुण्यातून पहिला राजीनामा देणारा मी पदाधिकारी होतो. तेव्हापासून आजपर्यंत मी 18 वर्षांमध्ये साहेबांना कधी काही मी खोटं चित्र दाखवलं नाही. दाखवायची गरज पण पडली नाही. आता त्या गोष्टी करुन आणि बोलून काही होणार नाही. म्हणून मी ते टाळलं," असं वसंत मोरे म्हणाले.