गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : हिंगोली... निजामाच्या जुलमी राजवटीला मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद बहिर्जी शिंदेचा हा जिल्हा. याच वीरांच्या रणभूमीत औंढा नागनाथचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं पवित्र आठवं ज्योतिर्लिंग आहे. भागवत धर्माची पताका अटकेपार पोहोचवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्मगाव नर्षी याच जिल्ह्यातलं... संतांची भूमी म्हणून ओळख असलेला हा जिल्हा गोंधळी, भारुडी, शाहिरी, पोतराज आणि कलगीतुरा या लोककलांसाठी प्रसिद्ध आहे. शेती हाच काय तो इथल्या नागरिकांचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मे १९९९ साली मूळच्या परभणी जिल्ह्यातून ५ तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. गुजरात काँग्रेसचे प्रभारी अॅड. राजीव सातव हे इथले खासदार आहेत. माजी मंत्री रजनी सातव यांचे ते सूपुत्र... बालपणापासूनच त्यांना घरात राजकारणाचं बाळकडू मिळालं. खासदार या नात्यानं त्यांना एका सेवाभावी संस्थेकडून संसदरत्न पुरस्कारही मिळाला. पण भाजप-शिवसेनेचं सरकार विरोधी खासदारांच्या मतदारसंघात कामच करत नाही, असा आरोप सातव करतात...हिंगोली, कळमनुरी, वसमत, नांदेडमधील हदगाव आणि किनवट तसंच यवतमाळमधील उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे.



१९७७ साली हिंगोलीचे पहिले खासदार होण्याचा मान जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटील यांनी मिळवला. १९८० मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत राठोड यांनी मतदारसंघावर मजबूत पकड मिळवली. सर्वाधिक १५ वर्षं ते खासदार होते. इथून पाचवेळा काँग्रेसचा आणि चारवेळा शिवसेनेचा खासदार विजयी झालाय. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडं होता. मात्र २०१४ मध्ये सातव यांच्यासाठी काँग्रेसनं ही जागा सोडवून घेतली. देशात आणि राज्यात मोदी लाट असतांना राजीव सातव यांनी अवघ्या १ हजार ६३२ मतांनी शिवसेनेचे तत्कालिन खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. अख्ख्या राज्यात नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव असे काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले.


यापैकी अशोक चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. तर सातवांना गुजरातचं प्रभारीपद मिळालं. आता हिंगोलीच्या जागेवर शिवसेनेसह भाजपही दावा करतंय... राजीव सातव निवडून आल्यानंतर हिंगोलीत काँग्रेसला अच्छे दिन येतील, असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही.


काँग्रेसला केवळ कळमनुरीची जागा जिंकता आली. भाजपनं हिंगोली आणि उमरखेड, तर शिवसेनेनं वसमत आणि हदगाव अशा प्रत्येकी दोन मतदारसंघात विजय मिळवला. किनवटच्या रूपानं राष्ट्रवादीनं एक जागा जिंकली. काँग्रेसच्या ताब्यात असलेली कळमनुरीची नगरपालिका शिवसेनेनं हिसकावून सातवांना दूसरा धक्का दिला. जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी सातवांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी अभद्र आघाडी करावी लागली. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीकडे मताधिक्य असतानाही माजी आमदार सुरेश देशमुखांना शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत व्हावं लागल्यानं काँग्रेसची मोठी नाचक्की झालीय.


राजीव सातव यांच्या जागेवर राष्ट्रवादीचाही डोळा आहे. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे पराभवानंतर भाजपवासी झालेत. ते स्वगृही परतण्यास इच्छुक असले तरी पक्षश्रेष्ठी त्यांना परत घ्यायला तयार नसल्याचं समजतंय. आता शिवसेनेकडून उमरखेडचे प्रकाश पाटील देवसरकर,वसमतचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ.बी.डी. चव्हाण ही मंडळी लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजी माने, माजी खासदार सुभाष वानखेडे, सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ शिवाजी जाधव आणि माहुर गडावरील सन्यस्थ शाम भारती महाराज देखील लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. यातील बहुतेकजण मतदारसंघात प्रचाराला लागलेत...


अनेक प्रतिस्पर्धी उमेदवार असल्यानं राजीव सातव यांच्यासाठी पुढची निवडणूक सोपी असणार नाहीय... त्यांच्याविरोधात शिवसेना उतरते की भाजप यावर सगळं अवलंबून आहे.