नितेश महाजन, झी मीडिया, जालना : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जालना जिल्ह्याचं महत्व वाढलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर अशा दिग्गजांचा हा जिल्हा... जालन्याचा राजकीय इतिहास आणि सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना... स्टील सिटी आणि सीड सिटी ही जालन्याची ओळख... बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळई निर्मितीचे कारखाने इथं आहेत. तसंच विविध पिकांचं बियाणं तयार करणारं शहर म्हणूनही जालन्याची ओळख आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार म्हणून जालन्याचं प्रतिनिधीत्व करतात...


१९९९ पासून लागोपाठ चारवेळा जालन्यातून निवडून येण्याचा बहुमान दानवेंच्या नावावर आहे. त्याआधी १९९० आणि १९९५ मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून एकूण ७ उमेदवार  रिंगणात होते. मोदी लाटेत भाजपच्या दानवे यांना ५ लाख ९१ हजार ४२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार विलास अवताडे यांना ३ लाख ८४ हजार ६३० मते पडली. २ लाख ६ हजार ७९८च्या मताधिक्यानं दानवे विजयी झाले.


जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन तसंच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, फुलंब्री आणि सिडको या भागांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांत मतदारसंघातल्या स्थानिक राजकारणात बराच बदल झालाय. शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतल्यानं जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असं चित्र आहे. जालना पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सोयगाव,फुलंब्री,अंबड,बदनापूर या नगरपालिका आणि नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. तर भोकरदन,जालना,सिल्लोड पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. शिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील काँग्रेसचं वर्चस्व अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे ३, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ आमदार निवडून आलाय.



बदनापूरमध्ये नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे आणि फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे असे भाजपचे ३ आमदार आहेत. जालन्यातून अर्जुन खोतकर आणि पैठणमधून संदिपान भुमरे असे शिवसेनेचे २ आमदार आहेत. सिल्लोडमधून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार विजयी झालेत.


जालना लोकसभा मतदारसंघात शेतकरी आणि कष्टकरी मतदारांचा भरणा आहे.शहरी भागात दलित, मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यावेळी शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यानं दानवे यांच्यासमोर काँग्रेससोबत शिवसेनेचंही आव्हान असणार आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही दानवे यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यानं इथली रंगत आणखी वाढलीय.