वेध मतदारसंघाचा : ठाण्यात पुढच्या वर्षी कुणाचा झेंडा ?
ठाणेकर आता खासदारांना साथ देणार की ठाणेकरांना बदल हवाय, हे काही काळातच कळणार आहे.
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई , ठाणे , मीरा भाईंदर ही तीन शहरं या मतदारसंघात येतात.प्रकाश परांजपे आनंद परांजपें या पिता पुत्रांनंतर पहिल्यांदा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आला. संजीव नाईकांनी या मतदारसंघावर पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. पण मोदी लाटेत पुन्हा शिवसेनेला यश मिळालं. सध्या राजन विचारे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.राजन विचारे यांना ५,९५,३६४ मतं पडली तर त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना ३, १४, ०६५ मतं मिळाली. २ लाख ८१ हजार २९९ मतांच्या फरकाने राजन विचारे विजयी झाले . या मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ऐरोली , बेलापूर , ठाणे शहर ,कोपरी पाचपाखाडी ,ओवळा माजिवडा आणि मीरा भाईदरचा समावेश आहे. यामध्ये ठाणे शहर, बेलापूर आणि मीरा भाईंदर भाजपकडे आहे. तर कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा शिवसेनेच्या ताब्यात आणि ऐरोली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे..
शिवसेनेचं वर्चस्व
ठाणे मतदारसंघात भरीव काम केल्यानं २०१९ च्या निवडणुकीतही विजय आपलाच, असा दावा खासदार राजन विचारे यांचा आहे.... शिवसेनेचे कार्यकर्ते तळागाळात काम करतात.... असं त्यांचं म्हणणंय. गणेश नाईक आणि कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून लांब आहेत. याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.. त्याचबरोबर मनसेची आता म्हणावी तशी हवाच न राहिल्यानं, त्याचाही फायदा शिवसेनेला होण्याचा अंदाज आहे. विरोधकांनी मात्र राजन विचारे यांचा दावा मोडीत काढत त्यांच्यावर टीका केलीय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती.... त्याचबरोबर शिवसेना-भाजपची युती होती. त्यात मनसेचा उमेदवार कमकुवत होता... त्यानं पन्नास हजार मतंही घेतली नाहीत. त्यामुळे या भागात शिवसेनेचं वर्चस्व आहे.... आता युती होते की नाही, भाजप आणि शिवसेना कोण उमेदवार देणार, यावर सगळी राजकीय गणितं अवलंबून आहेत.
ठाणं हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय... मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं जम बसवण्याचा प्रयत्न केला.... आता २०१९ साली मोदी लाट बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आहे... अशा परिस्थितीत ठाणेकर आता खासदारांना साथ देणार की ठाणेकरांना बदल हवाय, हे काही काळातच कळणार आहे.