Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ
Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
tomato onion potato price In Market : हिवाळ्यात बहुतांश भाज्यांचे दर वाढतात. मागच्या महिन्यापासून भाव कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. एरवी हिवाळ्यात दहा रुपयांना दोन ते तीन पालेभाज्यांच्या जुड्या विकल्या जातात. तर 10 रुपये पावशेरने बहुतेक फळभाज्या विकल्या जातात. असाच अनुभव जवजवळ दरवर्षी येतोय. मात्र मागच्या वर्षभरात सातत्याने अवेळी झालेल्या पावसाने भाज्या तसेच फळांचे गणित बिघडले. तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत आल्याचे भाव कधी नव्हे एवढे चढे राहिल्याचे पाहायला मिळाले. अजूनही लसणाची परिस्थिती काहीशी तशीच आहे. सध्याही लसणाचे भाव 70 ते 80 रुपये पावशेरपेक्षा कमी नाहीत.
प्रमुख भाज्यांचे दर वाढले
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्य माणूस आधीच वैतागला आहे. अशातच बटाट्याचे भाव, कांद्याचे भाव, टोमॅटोचे भाव या प्रमुख भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दैनंदिन खाद्यपदार्थाचे किमती वाढल्यामुळे याचाच परिणाम अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढले असून सध्या त्याची विक्री 20 रुपये प्रति किलो दराने केली जाते. तर कांद्याचा किरकोळ भाव 20 टक्क्यांनी वाढून 30 रुपये किलो झाले आहे, तर टोमॅटोच्या दरात दरवर्षी 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने विकली जात आहे.
'या' भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
पुढील काही महिन्यांत टोमॅटो, बटाटा यांसारख्या भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी टोमॅटो आणि बटाट्याचे भाव अनुक्रमे 36 टक्के आणि 20 टक्क्यांनी घसरले होते. जुलै 2023 मध्ये, पावसाळ्याच्या खराब परिस्थितीमुळे, टोमॅटोच्या किमती 202 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये त्याची किंमत 100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त होती. यानंतर सरकारने पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी बाजारात हस्तक्षेप केला आणि अनेक ठिकाणी टोमॅटो 70 रुपयांनी विकले गेले.
कांदा सध्या किरकोळ बाजारात 30 रुपये किलो दराने विकला जातो. गेल्या तीन महिन्यांत त्याची किरकोळ किंमत 25 टक्क्यांनी घसरली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कांद्याच्या किमतीत 74 टक्क्यांनी वाढ झाली होती, त्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याता आजचा भाव एक हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे, जो महिन्याच्या सुरुवातीला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल होता. टोमॅटो, बटाटा आणि कांद्याचा महागाई दर अनुक्रमे 0.6 टक्के, 1 टक्के आणि 0.6 टक्के आहे. अशा स्थितीत या भाज्यांचे भाव वाढले तर त्याचा परिणाम अन्नधान्य महागाईवर नक्कीच पाहायला मिळेल.