गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. दरवर्षी प्रत्येकजण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अशावेळी प्रत्येक कुटुंबाचं एक बजेट असतं. हे बजेट यंदा कोलमडणार आहे. खास करुन महिलांचं किचन बजेट. कारण भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांना वाढ झाली आहे. गणेशोत्सवात भाज्या आणि फळांना सर्वाधिक मागणी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवक कमी झाल्याने लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.


श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून 90  ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी 7 ते 8 टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून 3 ते 4 टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून 4 ते 5 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून 10 ते 12 टेम्पो गाजर, गुजरातमधून 3 ते 4 टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून 10 ते 12 टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.


पालेभाज्यांची अवाक कमी 


पावसामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवकही कमी झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. कांदापात, मुळे, राजगिरा, चाकवत, पुदीना, चवळई, पालकचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर 70 जुडी, मेथीच्या 50 हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.


घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे –


कोथिंबीर – 3000 ते 4000 रुपये


मेथी – 1500 ते 2500 रुपये


शेपू – 1000 ते 1500 रुपये


कांदापात – 1500 ते 2000 रुपये


चाकवत – 800 ते 1000 रुपये


करडई – 500 ते 800 रुपये


पुदिना – 500 ते 1000 रुपये


अंबाडी – 500 ते 1000 रुपये


मुळे – 1000 ते 1800 रुपये


राजगिरा – 500 ते 800 रुपये


चुका – 500 ते 1000 रुपये


चवळई – 500 ते 800 रुपये


पालक – १००० ते १८०० रुपये.


फळांचे दर मात्र स्थिर


फळबाजारात अननस, लिंबू, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, सीताफळ, पपई, चिकू, पेरुचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी फळांच्या दरात फार बदल पाहायला मिळाले नाही. गणेशोत्सवाच्या काळात फळांना सर्वाधिक मागणी असते.