भाज्यांचे भाव गगनाला भिडले; पाहा काय आहेत भाज्यांचे दर
गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं...
ठाणे : हिरव्या पालेभाज्या दररोजच्या आहारात असल्या पाहिजेत असं सगळे सांगतात. पण हिरव्या पालेभाज्या खाणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तीस चाळीस रुपये किलोनं मिळणारी भाजी शंभरीपार गेली आहे.
भाजी विक्रेत्यांकडे एक शेवग्याची शेंग तब्बल २५ रुपयांना विकली जातेय. मटार दीडशे ते दोनशे रुपये किलोच्या घरात विकला जातोय. एरव्ही पाच ते दहा रुपयांना विकली जाणारी पालकची जुडी ऐंशी रुपयांच्या भावाने विकली जात आहे. कांद्याच्या पातीचा भाव शंभर ते सव्वाशे रुपयांवर पोहचला आहे. एरव्ही चाळीस रुपये किलोच्या भावाने मिळणारी वांगी, भेंडी, घेवडा, गवार आणि कोबी शंभरीच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरचा भाव दिडशे रुपयांच्या घरात आहे. भाज्यांचे भाव वाढल्यानं गृहिणींचं किचन बजेट पार कोलमडून गेलंय.
जे शाकाहारी आहेत त्यांची तर मोठी अडचण झाली आहे. महागडी भाजी विकत घेण्याशिवाय काहीच पर्याय नाही. पाऊस लांबल्याने भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांचे भाव वाढल्याने ग्राहकही कमी झाले आहेत. अजून महिना दीड महिना तरी ही स्थिती कायम राहू शकते, असं भाजी विक्रेते सांगतात.
भाज्यांचे भाव |
आधी |
आता |
ब्रोकली | २०० रुपये किलो | ४०० रुपये किलो |
शेवगाच्या शेंगा | ८० रुपये किलो | ३२० रुपये किलो |
कोथिंबीर | ३० रुपये जुडी | १२० रुपये जुडी |
मटार | १०० रुपये किलो | १४० रुपये किलो |
टोमॅटो | ३० ते ४० रुपये किलो | ८० रुपये किलो |
गवार | ६० ते ८० रुपये किलो | १२० रुपये किलो |
भेंडी | ८० रुपये किलो | १०० रुपये किलो |
दुधी | ६० रुपये | १०० रुपये |
कोबी | ६० रुपये किलो | १०० रुपये किलो |
फ्लॉवर | ७० रुपये किलो | १०० रुपये किलो |
सिमला मिरची | ८० रुपये किलो | १०० रुपये किलो |
मेथी जुडी | २० ते ३० रुपये जुडी | ७० रुपये जुडी |
पालक | ३० रुपये जुडी | ७० रुपये जुडी |
मुंबईतला भाजीपाला ज्या नवी मुंबईत येतो. त्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाज्यांच्या किंमती आणि किरकोळ बाजारातल्या भाज्यांच्या किंमतीत मोठी तफावत आहे. आधीच भाज्यांचा तुटवडा असताना व्यापारी आणि दलाल मात्र स्वतःचं उखळ पांढरं करत असल्याचा आरोप केला जातोय.