एक रुपये किलोने भाजीपाला विकण्याची वेळ; शेतकरी बेजार
भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे भाव पडले आहेत
गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : एक रुपयाला एक मेथीची जुडी परभणी येथील बाजारात विकली जात आहे. भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे भाव पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे.
महिन्याभरापूर्वी दहा ते वीस रुपयाला विकणारी मेथीची जुडी परभणीच्या शनिवार बाजारात एक रुपयाला विकली गेली आहे. आता हे शेतकरी लोकांना बोलावून, आवाज देत पाच रुपयांत, पाच मेथीच्या जुड्या विकत होते.
लक्ष्मण गोरे हे परभणी जिल्ह्यातील उमरी गावचे शेतकरी आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील कापूस सोयाबीन खराब झाल्यानंतर नव्या उमेदीने उभं राहतं एक एकरात मेथी आणि एक एकरात कोथिंबीरिची लागवड केली. पण बाजारात आवक वाढल्याने अवघ्या एका रुपयात कोथिंबीर आणि एका रुपयात मेथीची जुडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. हीच परिस्थिती टोमॅटो, कोबी, पालक, वांगी या भाज्यांची आहे.
परभणीच्या मार्केट यार्डात किरकोळ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. वीस किलो टोमॅटोच्या कॅरेटला वीस रुपये भाव दिला जात आहे. मेथी ७५ ते १०० रुपये शेकडा, कोथिंबीर पालक पाच ते दहा रुपये किलो, वांगी तीन ते चार रुपये किलो, बटाटे दहा रुपये किलो, आवरा शेंग दहा रुपये किलो, कांदे दहा ते पंधरा रुपये किलो, मिरची १५ ते २० रुपये किलो, हे भाव इतके कमी आहेत की यात शेतकऱ्याचा वाहतूक खर्चही निघत नाही.
व्यापारी स्वस्त दरात भाजी खरेदी करुन चढ्या दराने ग्राहकांना विकतात. यात बळीराजा आणि ग्राहक दोघेही भरडले जातात.
तर दुसरीकडे, राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जळगाव, नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नांदगावसह परिसरात ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर नांदगावच्या काही भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरासह रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद, जालना उस्मानाबादमध्येही अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.