अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील व्यावसायिक वाहनांच्या पासिंगचं काम सध्या जवळजवळ ठप्प आहे. परिवहन खात्याच्या कारभाराचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. आजच्या परिस्थितीत राज्यातील सुमारे ३ ते ४ लाख व्यावसायिक वाहनांचं पासिंग प्रलंबित असल्याचा दावा वाहतूकदार संघटनेनं केलाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक टिकारे पुण्यामध्ये भाड्याची रिक्षा चालवतात. दिवसभर रिक्षा चालवली तरच त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो. मात्र सध्या त्यांच्यावर आरटीओ कार्यालयात खेटे घालण्याची वेळ आलीय. त्यांच्या रिक्षाचं पासिंगचं होत नाहीये. हीच अवस्था सगळ्याच व्यावसायिक वाहनधारकांची आहे. 


टेम्पो, ट्रक, टेक्सी, बसेस अशा सगळ्याच प्रकारांतील व्यावसायिक वाहनांच्या पासिंगचं काम खोळंबलेलं आहे. वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक यंत्रणा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध नाहीये. 


ब्रेक टेस्टसाठी अडीचशे मीटरचा ड्रायव्हिंग ट्रॅक, लाईट टेस्टसाठी आवश्यक भिंत तसेच यंत्रसामुग्री, त्याचप्रमाणे व्हील अलाइनमेंट तपासण्यासाठी व्हेईकल रॅम्प यापैकी कशाचीच पूर्तता याठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वतःचं वाहन उभं ठेऊन व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ वाहनधारकांवर आलीय. 


व्यावसायिक वाहनांच्या फिटनेससंदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल आहे. त्या पार्श्वभूमिवर वाहनांच्या योग्यता पडताळणीची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आलीय. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ तसेच यंत्रणांच्या आधारावर पासिंगचे काम सुरु असल्याची माहीती प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिलीय. 


आरटीओ कार्यालयाचा कारभार नेहमीच टिकेचं लक्ष्य ठरत आलाय. याठिकाणी येणार्या नागरिकाला अकारण त्रास होणार नाही याची खात्री मिळणं अपेक्षित आहे. सद्यस्थितीत वाहनधारकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.