निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील गाड्याची तोडफोड करण्याचे सत्र सुरुच आहे. दोन गटातील वाद किंवा दहशत माजवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या टोळक्यांकडून फोडल्या जातात. त्याचा नाहक त्रास आणि नुकसान हे गोरगरीब जनतेला होत आहे. आज करण्यात आलेल्या तोडफोडीमुळे एका रिक्षा चालकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कारण हेमंत इंगळे यांची पोट भरणारी रिक्षा टोळक्याने फोडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात सध्या दहशद निर्माण करण्यासाठी गाव गुंडांकडून परिसरातील गाड्यांची तोडफोड केली जात आहे. या गुंडागर्दीमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील इंगळे परिवाराला याचा मोठा आर्थिक फटका बसलाय. काल रात्री हेमंत राजेंद्र इंगळे यांची रिक्षा टोळक्याने फोडली. त्यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले.


वर्षभरापूर्वी याच भागात अशाच प्रकारे गाड्या फोडल्या होत्या. वारंवर नागरिकांच्या गाड्या फोडण्याचं प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. दोषींवर कारवाई होईलच पण पुन्हा नागरिकांच्या गाड्या फोडल्या जाणार नाही यासाठी काही पावले उचलण्यात येणार आहेत.


मात्र टोळक्यांच्या या गुंडशाहीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अशा गुंडावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.