Video: `ज्याचा पैसा त्याची सत्ता`; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य
Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय....
Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे वादळ आलेलं राष्ट्रवादीमध्ये.
अजित पवारांचं बंड आणि राज्यातील राजकारण...
राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि शरद पवार यांच्या शब्दाबाहेर नसणाऱ्या काही आमदारांनी अजित पवार यांच्या साथीनं पक्षात बंडखोरी केली. ज्यांच्यावर शरद पवार यांचा दृढ विश्वास होता त्यांनीच पक्षाची साथ सोडली आणि राज्यात पुन्हा एकनिष्ठा, पक्षबांधणी, अस्तित्वाची लढाई यांसारखे शब्द सर्वसामान्यांच्या कानांवर आले.
या साऱ्यामध्ये मतदार म्हणून नागरिकांचं काही महत्त्वं आहे की नाही? की ही मंडळी त्यांचाच स्वार्थ साधणार असा आक्रमक प्रश्नही काहींनी उपस्थित केला. सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून बरेचजण व्यक्तही झाले. त्यातच एक व्हिडीओ प्रचंड शेअर होताना दिसत असून, त्या व्हिडीओतील शब्द सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना दिसत आहेत.
हेसुद्धा वाचा : देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत
कवीवर्य विंदा करंदीकर यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांची 'सब घोडे बारा टक्के' ही कविता सादर केली होती त्याचाच हा व्हिडीओ. jashnemarathi या इन्स्टा पेजवरून ही कविता सादर करण्यात आली असून इथं विंदांचा प्रत्येक शब्द आणि सध्याची परिस्थिती यामध्ये बरंच साम्य असल्याचं पहिल्या क्षणात लक्षात येतंय. तुम्ही पाहिलाय का हा व्हिडीओ?
काय आहेत विंदा करंदीकर यांचे शब्द?
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
जिकडे टक्के तिकडे टोळी
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!