Video : उड्डाणपुलाच्या पिलरवरुन पडली म्हैस; नागपुरातील भयंकर घटना
उड्डाणपुलाच्या पिलवर फिरत असताना ही म्हैस खाली पडल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात बांधकाम सुरु असलेल्या पुलावर चक्क म्हैस चढल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. नागपूरमध्ये पारडी उड्डाणपूलाच्या एका पिलरवर म्हैस उभी असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता धिम्या गतीने काम सुरु असलेला पारडीचा पूल नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
पुलाच्या परिसरात कोणताही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे अनेक जण बिंधास्त या उड्डाण पुलावर चढतात. मात्र आता जनावरेही या उड्डाणपुलावर फिरत असल्याचे दिसत आहेत. पण ही म्हैस उड्डाणपुलाच्या पिलरवर कशी पोहोचली हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
उड्डाणपुलाच्या पिलवर फिरत असताना ही म्हैस खाली पडल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. यामध्ये म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे आता हा उड्डाणपूल नव्याने चर्चेत आला आहे.
पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने हा पूल कायम चर्चेत आहे. या पुलाचा काही भाग 19 ऑक्टोबर 2021 रोजी कोसळला होता. त्यानंतरही या उड्डाणपुलाची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे पाहायला मिळत आहे.
ही म्हैस दीड तास पुलाच्या पिलरवर उभी होती. संध्याकाळी सहा वाजता ती खाली पडली. त्यावेळी ती जिवंत होती. तिच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. या म्हशीने अर्धा उड्डाणपुल पार केला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, केवळ 500 मीटर अंतर असणाऱ्या या पुलाचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसह जनावरांचीही सुरक्षा या पुलामुळे टांगणीला लागली आहे.