औरंगाबाद : अघोरी विद्येद्वारे कुठलाही त्रास दूर करू शकतो, असा दावा एक भोंदू बाबा औरंगाबादच्या हर्सूल परिसरात करत आहे. गणी कादर पठाण असं याचं नाव आहे. केवळ एक लिंबू कापून तुम्हाला होणारा त्रास हा भोंदूबाबा सांगू शकतो, असा त्याचा दावा आहे. भोंदूबाबाच्या हातचलाखीचा आणि करामतींचा व्हिडीओच 'झी २४ तास'च्या हाती लागलाय.  एका माणसाला असलेल्या शारीरिक त्रासाबाबतचा हा व्हिडीओ आहे. यात हा त्रास नेमका कशामुळे होतो? हे सांगण्यासाठी या पठाणने एक लिंबू कापलं आणि एका कागदाला आग लावली. त्यानंतर त्रास काय होता आणि कसा बरा होईल, हे तो सांगताना त्या व्हिडीओत दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्यावर कोणी जादुटोणा किंवा करणी वगैरे केली असेल तर ती दूर करण्याचा दावा, या गणी कादर पठाणने केलाय. दुसऱ्या एका व्हिडीओत गणी कादर पठाण हा एका महिलेचा अंगातली भूतबाधा घालवण्याचा दावा करताना दिसतोय. दर्ग्यातून महिलेला बाबा बाहेर काढतो आणि भुताला जायला सांगतो, असं या व्हिडीओत दिसतंय. 


'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या शहाजी भोसले यांनी हा सगळा भोंदूपणा उघड केलाय. याबाबत अंनिसने पोलिसांनाही माहिती दिली आहे. आता पोलीस भोंदूबाबावर काय कारवाई करणार? याची उत्सुकता आहे.