प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीत (Sangli Crime)चोरट्यांनी चोरी केल्यानंतर महिलेला फरफरट नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात या महिलेची धूम स्टाईलने पर्स लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला अक्षरशः फरफटत नेले. मात्र महिलेचे धैर्य आणि एका चारचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकाने चोरट्यांना खाली पाडलं आणि चांगलांच चोप दिला. सांगली शहरातल्या एसटी स्टँड जवळ हा सर्व प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज देखील समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली शहरातील हरिपूर रोडवर राहणारी पीडित महिला तिची दुचाकी पंक्चर झाल्याने मुलीसोबत गाडी ढकलत रस्त्याने निघाली होती. वर्दळीच्या असणाऱ्या कोल्हापूर रोडवरील एसटी स्टॅन्ड जवळ पोहचल्या असता दुचाकीवरून तिघेजण आले होते. मदतीच्या बहाण्याने त्यांनी महिलेच्या गळ्यात अडकवलेल्या पर्सला हिसडा मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित महिलेने आपल्या गळ्यातली पर्स सोडली नाही.


चोरट्यांनी दुचाकीवरुनच पर्ससोबत पीडित महिलेला अक्षरशः काही अंतर फरफटत नेले. भर रस्त्यात सायंकाळी घडत असलेल्या या प्रकारादरम्यान एका चारचाकी गाडीतून निघालेल्या तरुणाने प्रसंगावधान राखत गाडीचा पुढचा दरवाजा उघडला. ज्यामुळे दरवाज्याला चोरट्यांची दुचाकी धडकली आणि ते खाली पडले. यावेळी आसपासच्या नागरिकांनी धाव घेत, तिघा संशियतांना पकडून बेदम चोप दिला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताचं शहर पोलिसांनी धाव घेत तिघा चोरट्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. सुरज सत्ताप्पा भोसले, वैभव कृष्णांत पाटील आणि मुनीब मुस्ताक भाटकर अशी तिघा चोरट्यांची नावे आहेत. तर पीडित महिला ही घटनेत महिला जखमी झाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.



200 फूट नेले फरपटत 


पीडित महिला आपली मोपेड बिघडली म्हणून रस्त्याने धक्का मारत नेत होती. त्यावेळीच चोरट्यांनी महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने पर्स सोडली नाही. यामुळे चोरट्यांनी त्यांना तब्बल 200 फूट फरफटत नेले. यावेळी तिथून जाणाऱ्या कारचालकाच्या बाजूच्या व्यक्तीने हा प्रसंग आरशात पाहिला. त्यानंतर त्याने तात्काळ दरवाजा उघडला आणि चोरांचा प्रयत्न फसला. तितक्यात आजूबाच्या लोकांनी गोळा होत चोरट्यांना बेदम चोप दिला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, यातील दोघे हे  पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे समोर आले आहे.